OZEE - Entertainment Now
Zee Marathi is now available on OZEE
Install

निःस्वार्थ स्पंदनं..

जसा जसा गाडीचा वेग वाढत होता, तशी माझी धडधड वेग धरत होती. एवढ्या वेगाची मला कधी सवय नव्हती. वाहन चालवताना कधी ४०च्या वर काटा गेला तर अंगावर काटा यायचा. कासवाच्या गतीने पुढे सरकणाऱ्या मुंबईच्या रहदारीत वेगाने गाडी हाकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, पण आज चक्क माझ्यासाठी मुंबईतील रस्ते ओसाड पडल्यासारखे वाटत होते. इतकी वर्ष अडवणूक करणारे आज स्वतःहून माझ्यासाठी वाट मोकळी करून देत होती. मुठभर हृदयासाठी चाललेली धावपळ पाहून मी भारावून गेलो.

गाडी रस्ता कापत येड्यागत पळत होती. वळणांवर जणू ठोका चुकायचा, आयुष्यात पहिल्यांदा इतकी घाई होताना मी पाहत होतो. इतकी वर्ष आयुष्याच्या वाटेवर सरळमार्गी प्रवास केला. नाकासमोर चालायचा माझा अट्टाहास होता. आपण बरे नि आपले काम बरे! दुसऱ्यांच्या वाटेला जा कशाला? थोडा स्वार्थी होतो तसा मी, प्रत्येकजण थोड्याफार फरकाने असतो अगदी तसाच. माझ्यात वेगळेपण असं काहीच नव्हतं. चारचौघांसारखी देहबोली, दिसायला सामान्याच, शिवाय आईवडिलांच्या आज्ञेबाहेर नाही. शिक्षण, लग्न, नोकरी अशा आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांचे निर्णय त्यांच्या अनुमतीने घेतलेले. नाही म्हणायला पेटी वाजवायचो, आमच्या मामांकडून शिकलो होतो. तेवढंच काय ते वेगळेपण बाकी इतर सामन्यांसारखा मीही गर्दीत मिसळलो की त्यांच्यातला एक होऊन जायचो.

आयुष्यात भरीव काही करण्याची संधी कधी मिळालीच नाही ही खंत नाही, पण कुठेतरी वाटत असायचं आपण काहीतरी करायला हवं. कुटुंबियांसाठी खस्ता खाल्ल्या पण ते एक कर्तव्य म्हणून. मुलं मोठी झाली तसं ठरवलं की आता आपल्या अपूर्ण इच्छांचा पाठलाग करायचा पण बायकोच्या आजारपणामुळे सगळं रखडलं. मुलांनी त्यांची आईची जबाबदारी माझ्या खांद्यांवर सोपवून आपापल्या बायकांच्या चाकरीत धन्यता मानली.

एकदिवस अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने माझ्या बायकोची प्राणज्योत मालवली. इतक्या वर्षांची सोबत सुटली तेव्हा एकटेपणाच्या भीतीने धस्स झालं. स्वार्थीच विचार शेवटी, पण बायकोच्या जाण्याने अक्षरशः पिळवटून निघालो. आठवणींच्या कप्प्यातील अल्बम रोज चाळायचो. एकट्याला घर खायला उठायचं. आपण किती निरस आयुष्य जगलो याची सारखी जाणीव होत होती. कुणासाठी फुल न फुलाची पाकळी देण्याचा साधा विचारही माझ्या मनाला कधी शिवला नव्हता मग एक दिवस मनाचा हिय्या केला आणि तडक इस्पितळ गाठलं...

....गाडीने करकचून ब्रेक लावला. काही क्षणात निष्णात डॉक्टरांचा ताफा माझ्या भोवताली होता. ऑपरेशन गृहात 'तो' मलूल पडून होता. डोळ्यात प्राण आणून माझीच वाट पाहत होता बहुतेक आणि मग काही तासांच्यानंतर मी पुन्हा हव्याहव्याश्या बरगड्यांच्या सापळ्यात बंदिस्त झालो. काही काळापूर्वी सत्व गमावून बसलेल्या धमन्या रक्तप्रवाहाने फुगीर झाल्या होत्या अगदी तशाच निःस्वार्थ भावनेन भरून आलेल्या माझ्या छातीसारख्या जेव्हा मृत्युनंतर हृदयदान करण्याच्या फॉर्मवर मी स्वाक्षरी केली होती.

Latest Blog Posts

View All