OZEE - Entertainment Now
Zee Marathi is now available on OZEE
Install

गोडगुलाबी प्रेमासोबतच काळजाला भिडणारा 'सैराट'

खरंतर, एखाद्या दिग्दर्शकाचा पदार्पणातील सिनेमा सुपरहिट झाला की, खऱ्या रसिकांना त्याच्या पुढील सिनेमाची ओढ लागते, मात्र, काहींना पहिल्या प्रयत्नातले यश दुसऱ्या सिनेमात फारसं पचवता येत नाही, परंतू हे समीकरण दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी बदलून दाखवले आहे. पहिल्या सिनेमातला, 'फँड्री'तला भिरकवलेला दगड आजही आपल्याला अस्वस्थ करतो. त्या दगडाने घातलेला घाव 'सैराट' मधून काळजाचा ठोका चुकवतो. नागराज मंजुळे आता नव्या दमाच्या नवख्या जोडीला घेऊन 'सैराट'च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'सैराट' म्हणजे केवळ सुसाट, वेगवान नव्हे तर एक सुन्न करणारा जिवंत अनुभव.

बिटरगावात घडणारी ही एक वेगळ्या धाटणीची प्रेमकथा मांडण्यात आली आहे. गावातील उच्चभ्रू पाटलाच्या घरातील आर्ची (रिंकू राजगुरू) व गावात मासे विकून पोट भरणाऱ्या परश्या (आकाश ठोसर) यांची ही प्रेमाची गोष्ट आहे. एकमेकांच्या मनात दोघांबद्दल असलेलं प्रेम, ते व्यक्त करण्याची पद्धत, सर्वकाही अफलातून आहे. बॉलीवूड धाटणीची ही प्रेमकथा असली तरी त्यात अनेक खाचखळगे आहेत. दोन भिन्न समाजातील दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम जडते. बेधडक, बिनधास्त आर्चीचे परश्यावरचं प्रेम व परिस्थितीची जाण असलेल्या परश्याची प्रेमकथा पूर्वार्धात बहरते. प्रत्येक दृश्य, त्यातला प्रेमाचा गुलाबी रंग मांडताना नागराज मंजुळेने कमाल केली आहे. पूर्वार्ध संपताना त्याचं प्रेम आर्चीच्या घरच्यांना समजते व इथून सुरु होतो चित्रपटाचा एक वेगळा प्रवास. जातीतली दरी दोघांचा कशा पद्धतीने पाठलाग करते याचे चित्रण सिनेमातून करण्यात आले आहे. बिटरगाव-करमाळा-बिटरगाव असा सुरु झालेला प्रवास उत्तरार्धात थेट हैदराबादमध्ये जावून पोहचतो. दोघांचा जगण्यातला संघर्ष, घरच्यांपासून लांब राहून स्वतःसाठी जगणं, लग्न करून सुखाचा संसार सुरु करणं, आपल्या लहानग्या सोबत सुखाचा संसार करणाऱ्या आर्ची व परश्याच्या आयुष्यात शेवटाला एक अनपेक्षित घटना घडते व सिनेमा पुन्हा एकदा धक्का देतो.

आर्ची व परश्या म्हणून सिनेमातून भेटलेल रिंकू राजगुरू व आकाश ठोसर याचं कौतुक करावे तितके कमीच आहे. दोघांचा अभिनय लाजवाब. रिंकूने साकारलेली बेधडक, बिनधास्त, बोलक्या डोळ्याची, परश्यावर जीवापाड प्रेम करणारी आर्ची मनाला मोहिनी घालते. तिचं व्यक्त होणे अप्रतिम. आकाश ठोसरही सिनेमातून आपली छाप पाडतो. याशिवाय परश्याचे मित्र म्हणून समोर येणारे, जीवाला जीव देणारे सल्या (अरबाज शेख) व प्रदीप (तानाजी गलगुंडे) लक्षात राहतात. सुरेश विश्वकर्मा, सुरज पवार, छाया कदम यांनीही आपल्या भूमिका चोख वठवल्यात.

चित्रपटाची आणखीन एक जमेची बाजू म्हणजे अजय-अतुल याचं अप्रतिम संगीत व सुधाकर रेड्डीचा कॅमेरा. अजय-अतुलच्या संगीताने सिनेमा प्रदर्शनापूर्वीच रसिकांना याड लावलं होतं. सिनेमा अधिक मनोरंजक करण्यात सिनेमातील गाण्यांचा महत्वाचा वाटा आहे. सुधाकर रेड्डीचा कॅमेराही सुरेख. काही दृश्ये त्याने ज्या पद्धतीने टिपली आहेत ती तर अप्रतिम आहेत.

शेवटी उल्लेख करावा लागेल तो द ग्रेट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा. नागराज मंजुळे यांनी लिहिलेली कथा-पटकथा-संवादही तितकेच ताकदीचे आहेत. आपल्याला जे वाटतं ते वास्तवाचे भान ठेवून ताकदीने मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे असेच दिसते. सिनेमाच्या पहिल्या मिनिटापासून सिनेमा ज्या पद्धतीने पुढे सरकतो व प्रेक्षकांना शेवटच्या मिनिटापर्यंत गुंतवून ठेवण्यात नागराज मंजुळे यशस्वी झाले आहेत. शेवटी, नागराज आपल्या ठेवणीतला एक जळजळीत 'आसूड' पुन्हा एकदा आपल्या समाज व्यवस्थेवर, चिमुकल्या जीवाच्या पाऊलांच्या माध्यमातून ओढतोच. गोडगुलाबी प्रेमासोबतच, नागराज मंजुळे यांचा 'सैराट' मनाला चटका लावून जातो.

Latest Blog Posts

View All