OZEE - Entertainment Now
Zee Marathi is now available on OZEE
Install

सुवर्ण नाट्यक्षणांचे नवरस!

नाटक म्हणजे मराठी माणसाचा श्वास! नाटक न पाहिलेला मराठी माणूस जग पालथं घातलं तरी सापडणार नाही, म्हणूनच मराठी नाटकांमधील संवाद, गाणी रसिकांच्या कायम स्मरणात असतात. ‘संगीत मानापमान’मधील बालगंधर्वांची पदे असतो, वा ‘एका लग्नाची गोष्ट’मधील प्रशांत दामलेंचे ‘मला सांगा सुख म्हणजे...’ गाणे असो, 'ती फुलराणी' मधील भक्ती बर्वेंचे ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ हे स्वगत किंवा ‘नटसम्राट’मधील श्रीराम लागूंची स्वगतं असोत, मराठी रसिकांच्या मनात खोलवर ही सादरीकरणं दडलेली असतात.

झी नाट्य गौरव पुरस्काराच्या निमित्ताने, अशाच काही एव्हरग्रीन नाट्यक्षणांना उजाळा देऊया!

१. तुला शिकवीन चांगलाच धडा – पुलंच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेल्या ‘ती फुलराणी’ या नाट्यपुष्पात, भक्ती बर्वे-इनामदार यांनी साकारलेल्या फुलराणीने आपल्या अप्रतिम अभिनयाने मराठी रंगभूमीला समृद्ध केलं.
2. गोड गोजिरी लाज लाजरी – महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार भरत जाधव यांच्या ‘श्रीमंत दामोदर पंत’ नाटकातील नृत्यकौशल्याने महाराष्ट्राला वेड लावले होते. ‘गोड गोजिरी..’ सारख्या गोजिऱ्या गाण्यावर असा डान्स फक्त आणि फक्त भरत जाधवच करू शकतात.
3. तो मी नव्हेच – आचार्य अत्रेंचा लखोबा लोखंडे नाट्यवर्य प्रभाकर पणशीकरांनी अगदी हुबेहूब रंगभूमीवर रंगवला. आपल्यावरील सगळे आरोप खोडून काढताना, पणशीकर खर्जातल्या आवाजात म्हणत, ‘तुम्ही काहीही म्हणलात तरी तो मी नव्हेच’
4 टांग टिंग टिंगाक – ‘मोरूची मावशी’ या नाटकात ‘टांग टिंग टांग टिंग टिंगाक’ म्हणत स्टेजवर पिंगा घालणाऱ्या विजय चव्हाणांचा ‘पिंगा’ आजच्या मस्तानीलासुद्धा लाजवणारा आहे.
5. सखाराम बाईंडर – विजय तेंडूलकरांच्या सखाराम बाईंडरने मराठी रंगभूमी दणाणून सोडली. निळू फुलेंनी साकारलेल्या सखाराम बाईंडरने मराठी रंगभूमीला वेगळे वळण देऊ केले.
6. दिलीप प्रभावळकरांचे ‘क्लासिक’ एक्स्प्रेशन – प्रियांका चोप्रा असोत वा ऐश्वर्या राय, कोणत्याही सौंदर्यवतीला लाजवतील असे हसवा फसवी नाटकातील दिलीप प्रभावळकरांचे हे एक्स्प्रेशन –
7. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं – सुखाची व्याख्या सहज सोप्प्या शब्दांत रसिकांना पटवून देणारे गायक-अभिनेते प्रशांत दामले यांचे ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकातील हे गाणे बहुतेकांना तोंडपाठ असेलच.
8. नटसम्राट – कुसुमाग्रजांनी मराठी रंगभूमीला बहाल केलेली ही एक अप्रतिम नाट्यकृती! नटसम्राट नाटकात ‘कुणी घर देता का घर, दूर व्हा’ अशी एका पेक्षा एक स्वगतं होती, श्रीराम लागूंनी साकारलेला ‘नटसम्राट’ मराठी नाट्यप्रेमींच्या मनात कायमचं घर मिळवून गेला.
9. मच्छिंद्र कांबळींचे गाऱ्हाणे – ‘मालवणी सम्राट’ मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेला जगाच्या पाठीवर स्वतःची वेगळी ओळख मिळवून दिली. ‘वस्त्रहरण’ नाटकाने मराठी रंगभूमीला मालवणी भाषेचे भरजरी वस्त्रच जणू देऊ केले.

मराठी रंगभूमीवरील २०१५-१६ सालातील अभिजात नाट्यकृतींचा गौरव होणार आहे, येत्या रविवारी, १० तारखेला संध्याकाळी ७ वाजता झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात! झी नाट्य गौरव पुरस्कार सोहळ्यात या सुवर्ण नाट्यक्षणांचे सोबती व्हा.

Latest Blog Posts

View All