OZEE - Entertainment Now
Zee Marathi is now available on OZEE
Install

बॉक्स ऑफिसवर सुसाट 'सैराट'

आपल्या पहिल्याच चित्रपटामधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराटला संपूर्ण महाराष्ट्रात तुफान प्रतिसाद मिळत आहे. सैराटच्या जबरदस्त प्रमोशनचा चांगलाच फायदा सिनेमाला झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गाण्यांमुळे याड लावणारा ‘सैराट’ हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. चित्रपटाने अवघ्या दोन दिवसात ७.३५ कोटींची कमाई केली आहे. बॉक्स ऑफिसवर सैराटची गाडी सुसाट चालू असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. उत्कृष्ट कथा, कलाकारांचा नैसर्गिक अभिनय, अजय-अतुलचे श्रवणीय संगीत आणि नागराज मंजुळे यांचे उत्तम दिग्दर्शन, या बळावर सैराट प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी झाला आहे.

प्रेक्षकांचा असा जबरदस्त प्रतिसाद पाहता हा चित्रपट कमाईच्या बाबतीत ‘नटसम्राट’ला मागे टाकण्याची शक्यता आहे. नटसम्राटने तीन दिवसांत तब्बल १० कोटींचा गल्ला जमवला होता. 'सैराट’ने पहिल्याच दिवशी ३.५५ कोटी आणि दुस-या दिवशी ३.८० कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट मोठी झेप घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नटसम्राट नंतर पुन्हा एकदा एका नव्या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दरारा निर्माण करण्यात यश मिळवले आहे.

अजय-अतुल यांचे भन्नाट संगीत, नागराज मंजुळेचे कल्पक दिग्दर्शन आणि रिंकू-परश्या जोडीची आगळीवेगळी केमिस्ट्री यामुळे पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दर्शविली आहे.